पुसद, दि. 15 ऑगस्ट 2025 – तालुक्यातील मौजे पार्डी गावात यंदाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गावात देशभक्तीपर गीते, मुलांचा आनंद, नागरिकांची गर्दी आणि शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या लगबगीमुळे गावात उत्साहाचे वातावरण होते.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय येथून झाली. सरपंच सौ. उषाबाई विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी सर्व मान्यवर सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
यानंतर पार्डी येथील जि. प. उच्च प्राथमिक मराठी शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नागोराव चिरमाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते. मुलांनी यावेळी सुंदर कवायती सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. त्यानंतर मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर श्री. मनोहरराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत सतीसामंत बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री. चंद्रवंशी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ. उषाबाई जाधव उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. सोनोने सरांनी केले. तर श्री. तिडके सरांनी मार्गदर्शनपर भाषण करत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत देशभक्तीपर भाषणे करून सर्वांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमादरम्यान शाळेतील कर्मचारी श्री. एकनाथ वंजारे यांची सुकन्या कु. ग्रीष्मा एकनाथ वंजारे हिची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे MBBS करिता निवड झाल्यामुळे तिच्या यशाबद्दल सर्व ग्रामस्थ, शिक्षकवर्ग व मान्यवरांनी अभिमान व्यक्त केला. व पिता–पुत्रीचा शाल व श्रीफळ तसेच भावी डॉक्टर ग्रीष्मा ला Stethoscope भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा क्षण संपूर्ण कार्यक्रमातील विशेष आकर्षण व प्रेरणादायी पर्वणी ठरला.
सत्कारानंतर बोलताना कु. ग्रीष्मा म्हणाली की,
“अथक परिश्रम, कुटुंबाकडून मिळालेली साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आत्मविश्वास हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. माझ्या आई–वडिलांनी नेहमीच माझ्या शिक्षणाला प्राधान्य दिले, अनेक अडचणींवर मात करत मला प्रोत्साहन दिले. आईने नेहमी मायेचे पाठबळ दिले, तर वडिलांनी मेहनत, शिस्त व जिद्दीचे महत्त्व शिकवले. गुरुजनांनी प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा दाखवून केवळ अभ्यासच नव्हे तर जीवनमूल्येही रुजवली. त्यांच्या या योगदानाशिवाय माझे हे यश शक्य झाले नसते.”
तिच्या या मनोगताने संपूर्ण वातावरण भारावून गेले. विद्यार्थिनीने आपल्या यशामागील आई–वडिलांचे त्याग, शिक्षकांचे नि:स्वार्थ मार्गदर्शन आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा हातभार यांचा विशेष उल्लेख केल्यामुळे उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.
गावातील इतर विद्यार्थ्यांनी तिच्या या प्रवासातून प्रेरणा घ्यावी, शिक्षणाकडे गांभीर्याने पाहावे आणि मोठी ध्येये साध्य करण्यासाठी चिकाटी ठेवावी, असा संदेश या प्रसंगी उमटला. कुटुंबाचा आधार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यांची सांगड घातली, तर प्रत्येक विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो, असे प्रत्यक्ष उदाहरण ग्रीष्माने दाखवून दिले.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुलांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते, कवायती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण भारावून गेले.
अरुण बरडे DD NEWS PUSAD




👍