Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeAgricultureकोपरा बुद्रुक येथे ढगफुटीमुळे हाहाकार ! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, घरांत घुसले पाणी...

कोपरा बुद्रुक येथे ढगफुटीमुळे हाहाकार ! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, घरांत घुसले पाणी | Rain Rain Cloudburst

Rain Rain

कोपरा बुद्रुक येथे ढगफुटीमुळे हाहाकार ! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, घरांत घुसले पाणी

कोपरा बु., दि. 17 ऑगस्ट – पुसद तालुक्यातील मोजा कोपरा बुद्रुक परिसरात दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अचानक ढगफुटीमुळे गावात प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी साचले. या अतिवृष्टीमुळे केवळ शेतजमिनींचेच नव्हे तर नागरिकांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले.

गावकऱ्यांच्या माहितीनुसार, पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून सोयाबीन, कापूस यासह इतर हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे काही महिन्यांचे कष्ट पाण्यात वाहून गेले आहेत. शेतमाल वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेलाही फटका बसला. सुमारे 10 ते 20 घरं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली किंवा पूर्णतः राहण्यायोग्य राहिली नाहीत. अनेक कुटुंबांना आसरा गमवावा लागला असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही करण्यात आली.

घटनेनंतर प्रशासन तात्काळ सक्रिय झाले. तलाठी बृजेश ढाकणे साहेब यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली.

गावात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या घटनेवर सरपंच आम्रपाली गणेश भगत, सरपंच शेख मुख्तार, पोलीस पाटील नामदेव ढगे तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश भगत, असीम रब्बानी हे सर्व घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी पीडित नागरिकांना धीर दिला व मदतीसाठी प्रशासनाला योग्य ती मदत करण्याची मागणी केली.

या प्रचंड पावसामुळे केवळ गावापुरतेच नव्हे तर आसपासच्या भागातील वाहतुकीवरही परिणाम झाला. पुसद–उमरखेड रोडवरील पुलावर तब्बल 4 ते 5 तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक वाहने रांगेत उभी राहिली होती.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा यापूर्वी क्वचितच बसला होता. घरं, शेतं व जनावरांचे झालेले नुकसान भरून काढणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या प्रशासनाकडून पंचनामा सुरू असून, शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचू शकते, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

– असीम रब्बानी, DD NEWS PUSAD

RELATED ARTICLES

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments