Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsपुसद तालुक्यातील ग्रामपंचायत फुलवाडीचा गौरव - महा आवास अभियान पुरस्काराने सन्मानित

पुसद तालुक्यातील ग्रामपंचायत फुलवाडीचा गौरव – महा आवास अभियान पुरस्काराने सन्मानित

फुलवाडी प्रतिनिधी –
ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यासाठी दरवर्षी “महा आवास अभियान पुरस्कार” दिला जातो. सन 2024-25 साठी यवतमाळ जिल्ह्यातून पुसद तालुक्यातील ग्रामपंचायत फुलवाडीने हा मानाचा क्रमांक पटकावून आपले नाव जिल्हापातळीवर उज्ज्वल केले आहे.

या पुरस्कार वितरणाचा भव्य समारंभ 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने झालेल्या या सोहळ्यात मा. पालकमंत्री श्री. संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते फुलवाडी ग्रामपंचायतीला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र  प्रदान करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक, तसेच विविध गावांचे सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गौरवाचा हा क्षण अधिक संस्मरणीय बनविताना फुलवाडी ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सरपंच सौ. विमलबाई तुकाराम राठोड आणि ग्रामपंचायत अधिकारी बी. एस. गुळवे यांनी पुरस्कार स्विकारला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आणि अभिमानाचा भाव स्पष्ट दिसत होता. पुरस्कार स्विकारल्यानंतर त्यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या कामाची माहिती देत, हा यशस्वी प्रवास सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले.

फुलवाडी ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास व राज्य आवास योजनेत पारदर्शकता, वेगवान कामकाज आणि पात्र लाभार्थ्यांना योजना लाभ मिळवून देण्यात विशेष मेहनत घेतली. नियोजित कालावधीत घरांची बांधणी पूर्ण करणे, गुणवत्तापूर्ण साहित्याचा वापर, तसेच बांधकाम प्रक्रियेत लाभार्थ्यांचा सक्रीय सहभाग यामुळेच फुलवाडीने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले.

ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, गावातील स्वयंसेवी संस्था, तसेच नागरिकांनी यासाठी एकजुटीने प्रयत्न केले. विशेष म्हणजे, घर बांधणीसोबतच परिसराची स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्था, रस्त्यांची देखभाल, आणि सार्वजनिक सुविधांची उभारणी यावरही ग्रामपंचायतीने भर दिला आहे. त्यामुळे फुलवाडी आज केवळ आवास योजनांमध्येच नव्हे, तर एकूणच ग्रामविकासात एक आदर्श म्हणून उभी आहे.

पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी फुलवाडीच्या या यशाबद्दल अभिनंदन करताना सांगितले की, “अशा ग्रामपंचायतींनीच ग्रामीण भागाचा चेहरा बदलतो. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेले घट्ट नाते हीच खरी विकासाची गुरुकिल्ली आहे. फुलवाडी ग्रामपंचायतीने ती सिद्ध केली आहे.”

ग्रामपंचायत फुलवाडीचा हा गौरव केवळ गावापुरता मर्यादित नसून, संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा आहे. या यशामुळे इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा मिळेल आणि राज्यातील ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

– गौरव इंगळे, DD NEWS PUSAD

RELATED ARTICLES

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments