पुसद (प्रतिनिधी) : ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथे एक भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायतराज संस्थांना बळकट करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही कार्यशाळा जगदंबा माता मंदिर सभागृहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन पुसद पंचायत समितीचे चे गटविकास अधिकारी श्री. अमोलकुमार आंदेलवाड यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. आशिष काळबांडे उपस्थित होते.
या कार्यशाळेत पंचायतराज व्यवस्थेला अधिक सक्षम बनवण्यासाठी आणि गावोगावी शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, महिलांचे सक्षमीकरण, तसेच तंत्रज्ञानाचा वापर या सर्व क्षेत्रांमध्ये काय बदल घडवून आणता येतील यावर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. गावकुसातील प्रत्येक कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि कोणतेही कुटुंब वंचित राहू नये, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यशाळेत मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून ग्रामविकासाची दिशा स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, सुशासन युक्त पंचायत घडवून लोकाभिमुख व सक्षम पंचायत प्रशासन उभारणे ही काळाची गरज आहे. पंचायत राज संस्थांना स्वनिधी, सीएसआर व लोकवर्गणीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. गावपातळीवर जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गावांची निर्मिती करणे तसेच स्थानिक संस्था सशक्त करणे यावर भर द्यावा, असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, मनरेगा आणि विविध शासकीय योजनांचे अभिसरण करून विकासकामांना गती देता येते. उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून गावोगावी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. अशा सर्वसमावेशक प्रयत्नांतूनच खऱ्या अर्थाने समृद्ध पंचायत उभी राहू शकते, असे मान्यवरांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेत उपस्थित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विकास आराखडा तयार करताना गावातील प्राथमिक गरजा सर्वप्रथम ओळखून त्यानुसार योजना राबविण्याचा सल्ला दिला. पाणीपुरवठा योजनांची शाश्वत अंमलबजावणी, गावातील स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, अंगणवाडी केंद्रांची गुणवत्ता, शालेय शिक्षणाचा दर्जा, तसेच रोजगार निर्मितीसाठी विविध शासकीय योजनांचा कसा फायदा करून घ्यावा, याची माहिती सहभागींस देण्यात आली.
या कार्यशाळेत ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य, ,रोजगार सेवक, संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगणक परिचालकांसाठी शासनाच्या डिजिटल उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. डिजिटल ग्रामपंचायत, ई-गव्हर्नन्स आणि ऑनलाइन सेवा सुविधा यामुळे गावकऱ्यांना वेळेत सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच श्री. आशिष काळबांडे यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायत सदस्यांनी एकदिलाने काम करून गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. गटविकास अधिकारी श्री. अमोलकुमार आंदेलवाड यांनी पंचायतराज संस्थांना लोकशाहीचा खरा पाया संबोधून गावकुसातील समस्यांचे समाधान लोकसहभागातूनही शक्य असल्याचे नमूद केले. ग्रामविकासाच्या प्रक्रियेत पारदर्शकता व जबाबदारी या तत्त्वांचा अवलंब केल्यास गावाच्या प्रगतीस गती मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना विकासासाठी एक दिशा आणि प्रेरणा मिळाली. उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना, अशा कार्यशाळा झाल्यामुळे ग्रामविकासाचे नियोजन अधिक परिणामकारक पद्धतीने करता येते, असे सांगितले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन उत्साहपूर्ण झाले आणि समारोपानंतर उपस्थितांमध्ये गावविकासाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी श्री. संतोष डाखोरे यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी श्री. अश्विन तांबडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री प्रसाद खंदारे व श्री गणेश बंगाळे यांनी विशेष सहकार्य केले.




Good 👍
Good
👌🏻