Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenews“जुन्या गाडीचा जुगाड, अपंग-दिव्यांगत्वावर मात – ग्रामपंचायत ऑपरेटर असलेल्या विनोद राठोड...

“जुन्या गाडीचा जुगाड, अपंग-दिव्यांगत्वावर मात – ग्रामपंचायत ऑपरेटर असलेल्या विनोद राठोड ची प्रेरणादायी कहाणी” | Stubbornness, Willpower, And Determination

बेलोरा (ता. पुसद, जि. यवतमाळ):
शरीर अपंग-दिव्यांग असलं तरी मन अभंग असेल, तर कोणतीही अडचण अडथळा ठरत नाही – याचे उदाहरण ठरला आहेत बेलोरा येथील तरुण शेतकरी  विनोद राठोड.  निसर्गाच्या लहरीपणासोबत गरिबी, अपंग-दिव्यांगत्व आणि सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षाला तोंड देत त्याने आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विनोद राठोड – एक साधा, सरळ तरुण. अपंग-दिव्यांगत्वाच्या सावलीत आलेला, पण संघर्षातून झुंजत मोठा झालेला. आज तो आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात संगणक परिचालक म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. पण हे काम जितकं महत्वाचं, तितकंच उपेक्षितही आहे. महिनोन्‌महिने मानधन मिळत नाही, आणि मिळालं तरी ते पोटापुरतंही पुरेसं नसतं.

त्यामुळे सरकारकडून येणाऱ्या अपूर्ण मानधनाच्या भरोशावर न राहता, विनोद थोडीफार शेतीही करतो. त्याचेकडे १ एकर शेती आहे. पण त्याही शेतीला निसर्गाची साथ लाभत नाही. यावर्षीही पावसाने साऱ्यांची परीक्षा घेतली. पाऊस वेळेवर झाली नाही, काहींच्या पेरण्या वाहून गेल्या, तर काही ठिकाणी अजून पेरण्या सुरू आहेत. विनोदने मात्र वेळेवर पेरणी करून डवरणीची तयारी केली. पण इथेच त्याच्या अडचणीला सुरवात झाली. डवरणीसाठी त्याच्याकडे बैल नव्हते.

शेतकऱ्याच्या घरात बैल नसणं म्हणजे शस्त्रांशिवाय रणांगणात उतरल्यासारखं. पण इथेच विनोदने अपंग-दिव्यांगत्व, गरिबी, संकटं आणि परिस्थितीला जुगाडानं उत्तर दिलं.
घरात पडून असलेली एक जुनी मोटारसायकल घेतली. त्याला मागे लोखंडी अँगलनं डवरे बांधले. आणि सुरु केली डवरणी – इंधन, मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर!

हा अनोखा प्रयोग पाहून शेजारी गावकरीही थक्क झाले. कुणाला हसू आलं, कुणाला आश्चर्य वाटलं – पण सर्वांच्या मनात विनोदसाठी मनापासूनचा सन्मान निर्माण झाला.
काय माणूस आहे…! अपंग-दिव्यांग असूनही एवढं धाडस करतंय…! ” अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांच्या तोंडून सहज बाहेर पडत होत्या.

हा प्रसंग केवळ ‘जुगाडा’चा नाही – तर शेतकऱ्याच्या धडपडीचा, परिस्थितीवर मात करण्याच्या प्रेरणेचा, आणि शासनाच्या अपयशावर व निसर्गाच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित करणारा आहे.
एका संगणक परिचालकाला – जो दिवसागणिक शासकीय सेवा देतो, तोच मानधनाच्या प्रतीक्षेत महिनोन्‌महिने जगतो. अपंग-दिव्यांग असूनही त्याच्याकडे ना विमा, ना पक्की नोकरी, ना आरोग्य सेवा.
“शासनाला आमचं काम हवंय, पण आमचं मानधन नाही” – विनोद असं काही बोलत नाही, पण त्याच्या नजरेत हा वेदनेचा प्रश्न हमखास उमटतो.

शेतात कष्ट, कार्यालयात सेवा आणि घरी अपंग-दिव्यांगत्वाची मर्यादा – यांच्यात अडकलेला हा तरुण, कोणालाही दोष न देता आपलं जगणं सुंदर करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. तो कुणाला मागत नाही – फक्त देतो, एक उदाहरण ठेवतो. ” जिथे बैल नाहीत, तिथे जुनी गाडीही उपयोगी पडते फक्त जिद्द असली पाहिजे! “

आजच्या तरुणांसाठी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, आणि नवनवीन शेतीतंत्र शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, विनोद राठोड यांची कहाणी हे एक जळजळीत पण प्रेरणादायी वास्तव आहे.

गरिबीतून आलेलं स्वप्न जेव्हा जिद्दीच्या इंजिनावर धावू लागतं, तेव्हा ते कुणाचंही मन जिंकून जातं. विनोदच्या डोळ्यात अशाच स्वप्नांची ठिणगी आहे – आणि ते स्वप्न फक्त त्याचं नाही, तर संपूर्ण ग्रामीण भारताचं आहे…

संपादकाच्या किबोर्ड मधून …….

RELATED ARTICLES

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments