पाण्यासाठी पाथरवाडी येथील आदिवासी बांधवांचे उपोषण –
पुसद –
शिळोना ग्रामपंचायतला शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत विहिरीची जागा पाथरवाडी पाझर तलावाऐवजी भरपूर पाण्याचा स्रोत असलेल्या जांब नाला प्रकल्पाजवळ घेण्यात यावी, अशी मागणी पुसद तालुक्यातील पाथरवाडी येथील आदिवासी महिला व पुरुषांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे यापूर्वीच निवेदनाद्वारे केली होती. तसेच ६ मे रोजी पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. मात्र दखल न घेतल्याने अखेर पाथरवाडी ग्रामस्थांनी गावातच गुरुवारपासून उपोषण सुरु केले आहे. तालुक्यातील शिळोना ग्रामपंचायतसाठी जलजीवन मिशनअंतर्गत विहिरीची जागा पाथरवाडीमधील अतिशय लहान पाझर तलावाजवळ न घेता जांब नाला प्रकल्पावर सदर विहीर व्हावी. जेणेकरून जांब नाला तलाव हा पाथरवाडी पाझर तलावापेक्षा १५ पटीने मोठा आहे. तसेच केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या जलजीवन मिशन योजनेचा निधी व्यर्थ जाऊ नये व शिळोना ग्रामपंचायतला दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा व्हावा, तसेच पाथरवाडीमधील आदिवासी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी मागील दीड वर्षापासून शासनाकडे मागणीचा पाठपुरावा सुरू आहे. पाथरवाडीच्या ग्रामस्थांची ही मागणी पूर्ण न झाल्यास गुरुवार ९ मेपासून गावातील महिला आणि नागरिक गावामध्येच उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी एका निवेदनातून यापूर्वीच प्रशासनाला दिला होता.
मात्र प्रशासनाने कोणतीही सकारात्मक दखल न घेतल्याने गुरुवारपासून पाथरवाडी नागरिकांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. या गंभीरप्रकरणी प्रशासन कोणता निर्णय घेते? याकडे आता संपूर्ण तालुक्याच्या नजरा लागल्या आहेत. जोपर्यंत आमच्यावर होणारा अन्याय दूर होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. शासन आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी व तातडीने पाणीप्रश्न सोडवावा, असे आवाहन पाथरवाडीच्या ग्रामस्थांनी केले आहे.





