दारव्हा : २३ ऑगस्ट (प्रतिनिधी) –
दारव्हा शहरातील शिवकृपा ज्वेलरी दुकानातून २० ऑगस्ट रोजी सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या बुरखा घातलेल्या अज्ञात महिलेचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला. आरोपी मुमताज परविन अब्दुल शकील (६५, रा. नेहरू नगर, अकोला) हिला अटक करून तिच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
शिवकृपा ज्वेलरीचे मालक शिवम विजय पाले यांच्या तक्रारीवरून २२ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन दारव्हा येथे कलम ३०३ (२) भा.दं.सं. अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेले १२.६७० ग्रॅम वजनाचे, अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे ०४ जोड सोनेरी लटकन जप्त करण्यात आले.
या यशस्वी कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि पवन राठोड, अंमलदार बबलू चव्हाण, कुणाल मुंडोकार, सोहेल मिला, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी यांनी कारवाई केली. पुढील तपास पोलीस स्टेशन दारव्हा करीत आहे.



