महागांव, २८ ऑगस्ट २०२५ –
महागांव तालुक्यातील वाकान, कोदंरी, पेढी, पोखरी, सातघरी माळवागद, मोहदी आणि काळी दौ.या परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजविला. पावसामुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या परिसरातील शेतकऱ्यांचे शेतखाते उद्ध्वस्त झाले आहेत.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि सांगितले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी तातडीने पंचनामे करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यात १६ ऑगस्ट नंतर पुन्हा ढगफुटी सदृश सुसाट वाऱ्यासह धुंवाधार मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वाकान-कोदंरी परिसरातील पुराच्या पाण्याने रौद्ररूप धारण केल्यामुळे वाकान-कोदंरी ते माळहिवरा मार्गावरील पूल तुटला, काही वेळेसाठी हा मार्ग बंद राहिला.
कोदंरी गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विद्युत पुरवठा खंडित झाला आणि या दोन गावांचे संपर्क तुटले होते. वाकान-कोदंरी नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांची शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे तात्काळ मदत मिळेल. पाहणीवेळी वाकान येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पो. पाटील, ग्रामरोजगार सेवक आणि शासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
– अरुण बरडे DD NEWS PUSAD



