पुसद, दि. ८ नोव्हेंबर –
पुसद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष — शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेस — यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा पुसद येथील दरबार हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. माजी आमदार डॉ. वजाहत मिर्झा, शरद पवार पक्षाचे सरचिटणीस व निवडणूक प्रमुख शरद मैंद, दिलीप एडतकर, डॉ. मोहम्मद नदीम, अनिल शिंदे, डॉ. अकील मेमन, रवी पांडे, सय्यद ईस्ताक, अॅड. वीरेंद्र राजे, विजयराव चव्हाण, अनुकूल चव्हाण, परमेश्वर जयस्वाल यांच्यासह आघाडीचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, “पुसदचा सर्वांगीण विकास, लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि सत्तेतील एकाधिकारशाहीला पर्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही वर्षांत नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीत विकास थांबला असून नागरिकांच्या अपेक्षांनुसार काम झाले नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदारांना ठोस, एकत्रित आणि सक्षम पर्याय देण्यासाठी महाविकास आघाडी लढणार आहे.
या निर्णयामुळे पुसदच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याने आगामी नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.



