कुंभारीच्या सरपंचाची श्रीलंकन भरारी…
पुसद प्रतिनिधी –
‘कॉमन वेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरम’ या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत श्रीलंकेतील कोलंबो येथे २५ ते २७ जून, असे तीन दिवस ‘जेंडर इक्वालिटी चार्टर’ ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना दत्तात्रय पवार यांची निवड झाली आहे.
या परिषदेसाठी निवड झालेल्या अर्चना पवार या अमरावती विभागातील एकमेव महिला सरपंच आहेत. महाराष्ट्रातून केवळ तीन महिला सरपंचांची निवड झाली आहे, हे विशेष. या परिषदेत जगभरातील एकूण ३५ देश सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुसदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला नेतृत्वाचे योगदान व अडचणी’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट, मुंबई ही संस्था मागील ३० वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था बळकट व्हावी व महिलांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र व अन्य राज्यातही काम करते. या परिषदेत महिला सरपंचांनी महिला समता शिफारसपत्राला अनुसरून मांडणी करणे अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक सक्रिय सरपंच म्हणून या परिषदेमध्ये ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला नेतृत्वाचे योगदान व अडचणी’ या विषयावर मांडणी करण्यासाठी कुंभारीच्या सरपंच अर्चना पवार यांची निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने जागतिक व्यासपीठावर भारतातून महिला लोकप्रतिनिधींचे प्रश्न मांडण्याची संधी सरपंच अर्चना पवार यांना मिळणार असल्याने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होऊन योगदान द्यावे, अशी विनंती रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट, नवी मुंबईचे संचालक भीम रासकर यांनी सरपंच अर्चना पवार यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
बातम्या व जाहिरातीकरीता संपर्क –




