यवतमाळ – मुख्य अभियंता गिरीश जोशी यांची नुकतीच सचिवपदी झालेली पदोन्नती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांच्यावर 39 लाख 55 हजार रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असून संबंधित प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
जोशी यांनी भोकर येथे कार्यकारी अभियंता असताना संबंधित भ्रष्टाचार केल्याचा आरोप असून, त्याविरोधात न्यायालयात प्रकरण सुरू आहे. असे असतानाही त्यांना अधीक्षक अभियंता आणि त्यानंतर मुख्य अभियंता अशी दोन पदोन्नती मिळाल्या होत्या. आता त्यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याने ही बाब अधिकच चर्चेत आली आहे.
या संदर्भात कंत्राटदार रमेश गिरोलकर यांनी राज्य शासनाला शपथपत्र सादर करून जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, गिरीश जोशी यांनी शासनाला खोटे शपथपत्र दिले असून, “माझ्यावर कोणतीही न्यायालयीन केस नाही,” असा खोटा मजकूर नमूद केला आहे.
गिरोलकर यांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली असून, राज्याचे बांधकाम मंत्री यांच्याकडे जोशी यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी गिरीश जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी “सध्या मी हायकोर्टात आहे, “ असे सांगत स्पष्टीकरण देण्याचे टाळले.
या प्रकारामुळे बांधकाम विभागामधील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, यापुढे शासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



