सोलापूर (प्रतिनिधी) – “ती म्हणाली – बाई ग, इकडं जाऊ… तिकडे सरकारी दवाखान्यात वाट पाहायला लागेल… इथे पटकन होईल !”
अशा शब्दांत गोरगरीब गर्भवती महिलेला फसवण्यात येत होत. त्यांना माहित न करता, त्यांच्या पोटातल्या जीवाचा सौदा होत होता… तेही काही रुपयांच्या कमिशनसाठी !
होय ! सोलापूर शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे – काही आशा वर्करांनी खाजगी रुग्णालयांसोबत हातमिळवणी करून, सरकारी रुग्णसेवेपासून महिलांना दूर खेचण्याचा कट रचल्याचं उघड झालं आहे.
व्हॉट्सअॅपवर “डील”: सेविकांचं महाजाळं – या सगळ्याच्या मुळाशी आहे – श्रेयस नर्सिंग होम नावाचं खाजगी रुग्णालय. या संस्थेनं आशा वर्करांचा खास व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. त्यामध्ये ठरलं होतं – “रुग्ण द्या, कमिशन घ्या!” 25 टक्के बिलावर कमिशन, गिफ्ट्स, महागडं जेवण, मोबाईल रिचार्ज – असा ‘लालच’ दिला गेला आणि काही सेविका गोंधळल्या… त्यांनी तात्काळ मार्ग बदलला – सरकारी दवाखान्यात पाठवण्याऐवजी खाजगी रुग्णालयात रुग्ण पाठवले. या प्रकारात मुलभूत मानवतेचा आणि नैतिकतेचा संपूर्ण विसर पडल्याचं चित्र आहे.
पण… ‘सर्व आशा एकसारख्या नसतात !’ या सर्व गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट होणे महत्वाचे आहे की, सर्वच आशावर्कर चुकीच्या मार्गाने जात नाहीत. ही घटना धक्कादायक आहे, पण तितकीच शिकवण देणारीही आहे. काहीजणीमुळे संपूर्ण व्यवस्था बदनाम होऊ शकते – ही गोष्ट मान्य. पण त्याचवेळी, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेकडो आशा सेविका आजही गावोगावी जीवाचं रान करत आहेत.
आशा वर्कर म्हणजे आपल्या गावातील चालतं-फिरतं रुग्णालय आहेत. त्या कुठलाही थकवा न बाळगता गरोदर मातांची काळजी घेतात, बालकांच्या लसीकरणाची काळजी घेतात. आणि गरिबांच्या दारात आरोग्य पोहोचवतात. कोरोना काळात त्यांनी जीव धोक्यात घालून घराघरात माहिती पोहोचवली, तपासण्या केल्या आणि जनजागृती केली. सरकारी यंत्रणांची सेवा जिथे पोहोचत नाही, तिथे आशाताई असतात. त्यांना मोठा पगार नाही, फारसा सन्मानही नाही, पण त्यांचं काम मात्र अनमोल आहे. त्या अनेक प्रकारचे सर्वे करतात, घरोघरी भेटी देतात, समजावून सांगतात.
त्या आरोग्यसेविका, मार्गदर्शक आणि बहिणीसारख्या भूमिका पार पडतात. लहानशा मोबदल्यासाठी त्या आयुष्यभर गावात आरोग्याचा दीप प्रज्वलित करत असतात. काही अपवाद असतीलही, पण हजारो आशा वर्कर अजूनही निस्वार्थ सेवा करत आहेत. म्हणूनच, त्या ‘आशा’ नाहीत तर संपूर्ण समाजासाठी एक ‘आधारस्तंभ’ आहेत.
सोलापुरातीलच काही प्रामाणिक आशा सेविकांनी हाच प्रकार पाहिल्यावर तो तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला. त्यांनी पुरावे गोळा केले, स्क्रीनशॉट्स दिले, आणि प्रकाराची माहिती दिली.त्यांच्या या धैर्यामुळेच आज हे प्रकरण उजेडात आलं आहे.
चौकशी सुरू – खरे दोषी कोण ? सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा आरोग्य विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. जे पुरावे मिळाले आहेत – व्हॉट्सअॅप चॅट्स, रोख रक्कम, भेटवस्तू यावरून काही आशा सेविकांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. श्रेयस नर्सिंग होमवरही प्रलोभनाचे व्यवहार, गुप्त कमिशन, आणि “रुग्णांची खरेदी” यासाठी कायदेशीर गुन्हे दाखल होऊ शकतात.
DD News Pusad – Deep-n-Daily
“Daily News with Deep Insight” | दररोजच्या घडामोडी, सखोल माहिती व चिंतनासह
– अरुण बरडे (DD NEWS PUSAD)



