Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsवनवारला शाळेतील विद्यार्थिनींच्या राख्यांचे पंचायत समिती प्रांगणात भव्य प्रदर्शन

वनवारला शाळेतील विद्यार्थिनींच्या राख्यांचे पंचायत समिती प्रांगणात भव्य प्रदर्शन

वनवार्लां  (प्रतिनिधी) :
पुसद तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वनवार्लां येथे इयत्ता ७ वीच्या विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमा निमित्ताने एक अभिनव उपक्रम राबवला. मुख्याध्यापक गोपाल ठाकरे सर आणि वर्गशिक्षिका नम्रता पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी टाकाऊ साहित्याचा वापर करून विविधरंगी, आकर्षक आणि सर्जनशील राख्यांची निर्मिती केली.

या राख्यांचे प्रदर्शन पंचायत समिती, पुसदच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले. प्रदर्शनात शेकडो राख्या मांडण्यात आल्या होत्या, आणि प्रत्येक राखीत विद्यार्थिनींची कल्पकता, संयोजनकौशल्य आणि मेहनत दिसून येत होती.

जुन्या लग्नपत्रिका, रंगीत कागद, फॉइल पेपर, लेस, कुंदन, स्केच पेन, दोरे, टिकल्या, स्पंज आणि फेव्हिकॉल यासारख्या टाकाऊ आणि घरात सहज उपलब्ध साहित्याचा अत्यंत सुंदर उपयोग करत विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक राख्या साकारल्या.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारातील कृत्रिम वस्तूंऐवजी टाकाऊ वस्तूपासून शाळेच्या विद्यार्थिनींनीच स्वहस्ते आणि सर्जनशीलतेने तयार केलेल्या राख्या प्रदर्शनासाठी सजविण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यार्थिनींमध्ये स्वावलंबन, पर्यावरणस्नेही दृष्टिकोन आणि कलात्मकतेचा विकास झाला आहे.

या प्रदर्शनाला गटविकास अधिकारी मा. श्री आंदेलवाड साहेब, गटशिक्षणाधिकारी मा. श्री कांबळे साहेब, विस्तार अधिकारी श्री वाघमारे साहेब, श्री बोजेवार साहेब यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थिनींनी साकारलेल्या राख्यांचे निरीक्षण करत भरभरून कौतुक केले. अधिकाऱ्यांनी शाळेतील उपक्रमशीलतेचं अभिनंदन करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कलेचा गौरव केला.

मुख्याध्यापक गोपाल ठाकरे सर यांनी सांगितले की, “विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंना वापरात आणून जे निर्मितीकार्य केलं आहे, ते नक्कीच प्रेरणादायी आहे. या उपक्रमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला बळ मिळाले असून भविष्यात ते अधिक आत्मविश्वासाने काम करतील.”

वर्गशिक्षिका नम्रता पवार मॅडम यांनी सांगितले, “या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये एक वेगळी उमेद आणि सर्जनशीलतेची रुजवणूक झाली आहे. त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच कला, पर्यावरण आणि सामाजिक भानही मिळाले आहे.”

या अभिनव उपक्रमामुळे वनवारला शाळेचे नाव तालुक्यात विशेष उल्लेखनीय ठरले आहे. प्रदर्शनास पालक, स्थानिक ग्रामस्थ आणि इतर शाळांतील शिक्षकांनी देखील भेट दिली व विद्यार्थिनींच्या कौशल्याचे कौतुक केले.

– अरुण बरडे (DD NEWS PUSAD) 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments