पुसद प्रतिनिधी :
पुसद तालुक्यातील कवडीपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ‘सैनिक हो, तुमच्यासाठी’ या संकल्पनेअंतर्गत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी टाकाऊ साहित्यातून आकर्षक राख्या तयार करून त्या सीमेवरील जवानांना पाठविल्या.
या उपक्रमामागील उद्दिष्ट होते – देशासाठी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आणि विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव देणे. ज्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक नाते नाही, अशा सैनिकांनी देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. त्यांच्या त्यागासाठी विद्यार्थ्यांकडून राख्यांच्या रूपाने आपुलकीचा आणि आदरभावाचा संदेश पाठवण्यात आला.
या राख्या तयार करताना विद्यार्थ्यांनी जुनी लग्नपत्रिका, कुंदन, लेस, टिकल्या, फेव्हिकॉल, स्पंज, फॉईल पेपर, लोकर, स्केच पेन व अन्य टाकाऊ साहित्याचा उपयोग केला. या उपक्रमात शेकडो राख्या तयार करण्यात आल्या आहेत.
हा उपक्रम शाळेच्या शिक्षिका सीमा येरावार, करुणा काळे, संध्या बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यासाठी मुख्याध्यापक राजेंद्र तालंगकर यांच्यासह शिक्षक शशिकांत जामगडे, रंजना कोडगीरवार, मनिषा कान्नव, माधव कानगुले, श्रीकांत चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
शाळेतील या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, विस्तार अधिकारी उमेश वाघमारे, केंद्रप्रमुख विनोद मनवर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय पवार व पालकांनी मनःपूर्वक कौतुक केले आहे.
कोट:
“सैनिकांच्या निस्वार्थ सेवेसाठी आमच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ साहित्य वापरून आकर्षक राख्या बनवल्या असून, त्या पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत.”
— सीमा येरावार, विषय शिक्षिका, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, कवडीपूर



