Monday, April 20, 2026
Google search engine
Homenewsमाणुसकीच्या भिंतीने विणले मानवतेचे रक्षाबंधन – पुसद परिसरात उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

माणुसकीच्या भिंतीने विणले मानवतेचे रक्षाबंधन – पुसद परिसरात उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

पुसद प्रतिनिधी — नुसते नातेवाईकच नव्हे तर गरजवंत, निराधार आणि अनोळखी लोकांनाही प्रेमाने जोडणारा रक्षाबंधन सण यंदा पुसदमध्ये एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. “माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन” या संस्थेच्या महिला सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यावर्षीही सामाजिक बांधिलकी जपत जवळपास तीनशे गरजवंतांसोबत रक्षाबंधन साजरे करून मानवतेचे बंध दृढ केले.

गेल्या नऊ वर्षांपासून “माणुसकीची भिंत” दात्यांच्या मदतीने सतत विविध उपक्रम राबवत असून, कोणताही सण असो वा आपत्ती — गरजवंतांसाठी तातडीने मदत उभी करणे हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. व्हॉट्सअॅपवरील दहा वेगवेगळ्या गटांमधून तब्बल चार हजारांहून अधिक सदस्य जोडले गेले आहेत. कोणत्याही मदतीचे आवाहन करण्यात आले की, क्षणात प्रतिसाद मिळून आवश्यक रक्कम जमा होते.

यावर्षी रक्षाबंधन सणाच्या तयारीसाठी ३० हजार रुपये उभारण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अवघ्या तीन दिवसांत ४१,४०४ रुपये जमा झाले. त्यातून गरजवंत बांधवांसाठी टॉवेल, टोपी, धोतर, कपडे, पावसापासून बचावासाठी छत्र्या, तर निराधार महिलांसाठी साडी, लुगडे व राख्या खरेदी करण्यात आल्या.

कार्यक्रमाची सुरुवात पुसद येथील बाबासाहेब नाईक वृद्धाश्रमात झाली. महिला सदस्यांनी सकाळीच वृद्धाश्रमाची स्वच्छता करून रांगोळ्यांनी अंगण सजवले. वृद्धांना सन्मानाने पाटावर बसवून त्यांना पेढा, टोपी, टॉवेल, धोतर व छत्री भेट देण्यात आली. महिला सदस्यांनी मोठ्या प्रेमाने राखी बांधून ओवाळणी केली. त्यानंतर पोळी, भात, वरण-भाजी, बर्फी असा मायेचा भोजनसोहळा तसेच फळे व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले.

यानंतर “माणुसकीची भिंत” सदस्य उपजिल्हा रुग्णालयातील मदत केंद्रावर पोहोचले. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि पुसदमधील अन्य गरजवंतांना राखी बांधून टॉवेल, टोपी, पेढा देण्यात आले. रुग्णालयात भरती महिलांच्या हातून राखी बांधून घेतल्यानंतर त्यांना ओवाळणी म्हणून साडी-लुगडे देण्यात आले.

या दोन ठिकाणी मिळून सुमारे तीनशे गरजवंतांसोबत हा सण साजरा झाला. प्रेम, आदर, आणि मानवी संवेदना यांनी भरलेला हा सोहळा पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

या उपक्रमात “माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन”चे अध्यक्ष गजानन जाधव, सौ. मोनिका जाधव, संतोष गावंडे, पंजाब ढेकळे, अनंता चतुर, पंकजपाल महाराज, प्रभाकर पाटील, सोहम नरवाडे, आकाश शिंदे, मधुकर चव्हाण, मंगेश भगत, अरुण नागुलकर, शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, श्रीमती मंजुषा डेकाटे, श्रीमती शैलाताई सावंत, सौ. प्रतिभाताई कुशवाह, सौ. अल्का आघाम, डॉ. प्रणाली इंगोले, आनंद जाधव, ओम पंडितकर, प्रमिलाताई खंदारे, ज्ञानेश्वर राऊत, रूपाली नरडे, प्रशांत लासिनकर, सुरेश रोकडे, सचिन देशमुख, विनायक शेवकर, यशवंत देशमुख, रमेश डंबोळे, संदेश पवार, दिनकर दमकोंडावार, धनंजय चापके, अमोल धोबे, विनीत उदावंत, शैलाताई सुरावर, श्री बंग, मधुकर भानावत, संजय आसोले, प्रदीप निलावार, प्रेमभाऊ राठोड, निवृत्तीनाथ बैस्कार, गोपाल सुरोशे, मिलिंद बोबडे, रणजीत गायकवाड, अविनाश मुखरे, सागर भागवत, विनय चक्करवार, अनिल मुडे, निशांत देऊळकर, सचिन भिताडे, मंथन कदम, रेखाताई आगलावे, पूजाताई इंगोले, प्रियंका बेले, गौरव नाईक, सुरेखा मोगरे, संतोष हराळ, वैभव गोभे, अतुल व्यवहारे, रवी उबाळे, जयसिंग राठोड, चंदाताई अग्रवाल, मधुकर चिंतावार, अमोल व्यवहारे, महेश हंबर्डे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या आगळ्या-वेगळ्या रक्षाबंधन सोहळ्याचे पुसद परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, मानवतेच्या अशा बंधांनी समाजातील खरी एकजूट आणि प्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

– अरुण बरडे DD NEWS PUSAD

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments