पुसद – तालुक्यातील बोरी खुर्द मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले. उपविभागीय अधिकारी पुसद आणि तहसीलदार साहेब पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवकमल मंगल कार्यालय, बोरी येथे हे शिबिर संपन्न झाले. शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, तक्रारी आणि अर्ज सादर केले. अनेक प्रलंबित प्रकरणांना यावेळी मार्ग मिळाला आणि नागरिकांना शासनाच्या विविध योजना चा लाभ मिळवून देण्यात आला. एकूण १०२७ लाभार्थ्यांनी विविध उपक्रमांचा प्रत्यक्ष फायदा घेतला.
या शिबिराला नायब तहसीलदार वैभव खाडे साहेब, मंडळ अधिकारी विलास धुळधुळे, तलाठी ब्रिजेस डोखळे, सुमन निकम, सौरव मनवर, नरेश कराळे तसेच आरोग्य विभाग, आधार सेतु, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत आदी विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी समस्या निराकरणासाठी उपस्थित होते. महसूल, कृषी, आरोग्य, सामाजिक कल्याण आदी विभागांच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना या ठिकाणी मिळाला. सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी कार्य तत्परतेने पार पाडताना दिसून आले.

शिबिरात रहिवाशी, उत्पन्न, जात प्रमाणपत्र वाटप, नवीन रेशन कार्डची नोंदणी व वितरण, पीएम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा विविध योजनांशी संबंधित अर्जांची नोंदणी आणि मंजुरी झाली. घरकुल लाभार्थ्यांना रेती रॉयल्टी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच जिवंत सातबारा व फेरफार नोंदींचे निकालीकरण, कृषी सल्ला, तसेच विविध कृषी व आरोग्य योजना बाबत मार्गदर्शन देण्यात आले.
आरोग्य विभागामार्फत नागरिकांना पाच लाखांपर्यंतच्या उपचारासाठी लाभदायक अशा आरोग्य कार्डांचे वितरण करण्यात आले. शिबिरात आलेल्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या समस्यांवर मार्ग मिळावा यासाठी अधिकारीवर्गाने व्यक्तिगत लक्ष देऊन तातडीने कार्यवाही केली. यामुळे शिबिराला आलेल्या लोकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाचे संचालन कु. श्यामल पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन ब्रिजेस डोखळे यांनी मानले. स्थानिक नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहभागामुळे हे समाधान शिबिर यशस्वीपणे पार पडले. अशा उपक्रमांमुळे शासनाच्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
– अरुण बरडे DD NEWS PUSAD



