जांबबाजार – येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत विशेष शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनिल धूळधुळे (सरपंच जांबबाजार) यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सी. डी. राठोड (नायब तहसीलदार पुसद), संजय मारकड (मंडळ अधिकारी जांबबाजार), शेख कौसर शेख अख्तर (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, पुसद), दिपक रामराव शिंदे (पोलीस पाटील जांबबाजार), गणेश राठोड (माजी उपसरपंच जांबबाजार) उपस्थित होते.
मंचावर श्री. काळे ( ग्रामपंचायत अधिकारी), श्री. पवार, सुधा डुकरे (सहाय्यक कृषी अधिकारी), श्री. चव्हाण (पशुवैद्यकीय अधिकारी), श्री. सावळे (वनरक्षक), सुचिता पांडव व निकिता कांबळे (आरोग्य सेविका), अक्षय हातमोडे (आरोग्य सेवक), भगवान जामगडे (पोलीस पाटील), पंजाबराव पाटील (सरपंच वालतुर), वंदना ठाकरे (सरपंच भोजला), तहसील विभागातील श्रीमती राठोड, प्रणीत भवरे, केंद्रचालक इमरान खतीब, आधार केंद्र चालक शे. शाहीद, तसेच गावातील आशा वर्कर, सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, कोतवाल यांची उपस्थिती लाभली.
शिबिरात महसूल विभागाच्या वतीने नागरिकांना, ७/१२ उतारे, फेरफार, वारसा नोंदणी, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, शेतजमिनीची कागदपत्रे तपासणी, व इतर प्रमाणपत्रे अशा महत्त्वाच्या सेवा दिल्या.
आरोग्य विभागाने रक्तदाब तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, बालक व गर्भवती महिलांचे आरोग्य तपासणी, लसीकरण सेवा, पोषण आहारविषयक जनजागृती तसेच सामान्य आजारांवर औषधोपचार यासारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या.
कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकपद्धती, मृदा परीक्षण, खत व बियाणे निवड, शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची माहिती, तसेच सरकारी योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पशुवैद्यकीय विभागाने गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांसह जनावरांची तपासणी, रोगप्रतिबंधक लसीकरण, जनावरांच्या संगोपनाविषयी मार्गदर्शन केले.
महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून महिलांसाठी व बालकांसाठी पोषण, आरोग्य व जनजागृतीविषयक उपक्रम राबवले.
या शिबिरात लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवेचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, ग्राम महसूल अधिकारी प्रकाश मस्के, सुनील जाधव, अमोल राठोड, मनोज कोरडे, वनिता धूळगुंडे, हेमलता बिर्हाडे, शबाना शेख यांचा विशेष सहभाग होता.
सूत्रसंचालन वनिता धूळगुंडे, ग्राम महसूल अधिकारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोज कोरडे यांनी मानले.



