Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsकुंभारी तांडा शाळेच्या किचनशेड कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार

कुंभारी तांडा शाळेच्या किचनशेड कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार

कुंभारी तांडा – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बांधण्यात आलेल्या किचन शेडच्या कामात गंभीर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याची तक्रार, तक्रारकर्ते  शंकर उदेभान पवार  यांनी दिनांक १५ ऑक्टो.२०२५ रोजी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिली. त्या अनुषंगाने प्रशासनाने सदर कामाचा सविस्तर पंचनामा केला. यावेळी शाखा अभियंता एल. बी. बिलवाल सह सचिव, तक्रारकर्ते  व अनेक नागरिक उपस्थित होते.

शेडसाठी १५ व्या वित्त आयोगातून २ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मात्र प्रत्यक्ष उभे राहिलेले काम या निधीच्या तुलनेत अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे तक्रारकर्ते व गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, किचन शेडचे स्ट्रक्चर तांत्रिकदृष्ट्या खूपच कमजोर आहे. तीन्ही बाजूंना फक्त टीनपत्रे लावलेली आहेत, छत सुध्दा टीनपत्राचे आहे. तर चौथी बाजू पूर्णपणे शाळेची विद्यमान भिंत वापरून उभी ठेवली आहे. मंजूर रकमेत मजबूत पायाभरणी, पक्क्या भिंती, सुरक्षित बांधकाम असणे अपेक्षित असताना साध्या पद्धतीचे हलके बांधकाम केले असल्याचा आरोप केला जात आहे.

याशिवाय, शाळा व्यवस्थापन समिती (SMC) अध्यक्षांना न सांगता जागा निवडून काम केले गेल्याने गावात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. “मुलांच्या अन्नाशी संबंधित अशा महत्त्वाच्या सुविधेत असे हलगर्जीपणे काम करणे अमान्य आहे,” असे ग्रामस्थांनी सांगितले.

तक्रारदार शंकर उदेभान पवार म्हणाले, कि, “२ लाखांमध्ये चांगले, सुरक्षित आणि टिकाऊ किचन शेड उभे राहायला हवे होते. पण प्रत्यक्षात फक्त पत्र्यांचा आडोसा उभा केला आहे. तीनही बाजूचे टीन लावले आहेत, वारा-पावसात हे शेड धोकादायक ठरू शकते.”

यावेळी ग्रामस्थांनी अशीही तक्रार केली की, शेडचे कोलम, पाया, पत्रे बसवण्याची पद्धत, उंची—सर्वच बाबतीत निकृष्ट दर्जा स्पष्टपणे दिसतो. पावसात पाणी आत जाण्याची शक्यता आहे. यामुळे गरम जेवण तयार करण्यासाठी ही जागा अजिबात योग्य नाही, असे महिला आणि पालकांनी मत व्यक्त केले.

अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र गावकऱ्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत की, २ लाखांचा निधी मिळूनही इतकंच हलकं व साधे काम का?”

ग्रामस्थांनी साहित्याची नोंद, दरपत्रक, खर्च तपशील, बिल आणि तांत्रिक तपासणी यांची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. भ्रष्ट्राचार सिद्ध झाल्यास व दोषींवर कारवाई न केल्यास पुढील कठोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या पंचनाम्यावर तक्रारकर्ते शंकर पवार, गावातील ग्रामस्थ आणि शाखा अभियंता एल. बी. बिलवाल यांच्या सह्या आहेत. सदर कामाचे देयके अजून सबंधीताना दिले गेले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यातून व अहवाल आल्यानंतर नेमके प्रकरण उघड होईल. पंचनामा पूर्ण झाला असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

स्थानिक प्रतिनिधी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments