
पुसद – आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पुसद शहरात अवघी पंढरी अवतरली होती. विठ्ठल मंदिररासह विठुनामाच्या गजराने शहर भक्तिमय झाले होते. ज्ञानेश्वर संस्थान तर्फे मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. पुसद येथील विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महिला, पुरुष, अबाल वृद्ध यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ज्ञानेश्वर संस्थानच्या या विठ्ठल मंदिरात विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी ३ वाजता महापूजा करण्यात आली. त्यानंतर ज्ञानेश्वरीचे सामूयिक पारायण झाले. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत भजन व भक्तिगीतांचे विविध कार्यक्रम झाले.
विशेष म्हणजे ज्ञानेश्वर मंदिर संस्थानतर्फे यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. तसेच नागरिकांकडून देहदानाचे संकल्प पत्र भरून घेण्यासाठी स्टॉल लावण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, करा योग – रहा निरोगी, पाणी अडवा-पाणी जिरवा आदींचे फलक लावून भाविकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. भाविकांसाठी मोफत चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. साबुदाण्याची उसळ व राजगिर्याचेचे लाडू प्रसाद म्हणून देण्यात आले. या सोहळ्यानिमित्त बसस्थानक-गुजरी चौक ते परत एसटी स्टॉप पर्यंत भाविकांना निशुल्क वाहनांची सुविधा संस्थानाने उपलब्ध करून देण्यात आली होती. दिव्यांग भाविकांसाठी व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात आल्या. व त्यांना थेट दर्शनाचा लाभ देण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी १४०० सेवाधारी, मंदिर प्रशासनाचे कर्मचारी तैनात होते. पोलिस प्रशासन व नगरपालिका, विद्युत महामंडळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



