Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsठेवीदारांचा पैसा पूर्णपणे सुरक्षित – पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद

ठेवीदारांचा पैसा पूर्णपणे सुरक्षित – पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद

पुसद (प्रतिनिधी)
मागील एका महिन्यात पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांमध्ये अनामिक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठेवीदारांनी आपापल्या ठेवी काढण्यास सुरुवात केली आहे. तथापि, बँकेच्या सर्व शाखांमध्ये मागील ४० वर्षांपासून रिजर्व बँकेच्या निकषांनुसारच कामकाज होत असून ठेवीदारांनी कोणतीही भीती न बाळगता बँकेवरचा विश्वास कायम ठेवावा, असे आवाहन पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी पत्रकार परिषदेत केले.

शरद मैंद म्हणाले की, बँकेच्या स्थापनेपासूनच सर्वसामान्य ठेवीदारांच्या सहकार्याने तसेच सर्वसामान्य कर्जदारांना सहज कर्ज मिळावे या हेतूने बँकेची वाटचाल पारदर्शकतेने झाली आहे. बँकेचे संस्थापक दिवंगत आप्पाजी आसेगावकर, पहिले अध्यक्ष दिवंगत बाबुशेठ हिराणी, तसेच लोकनेते मनोहरभाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने स्थिर प्रगती साधली आहे.

त्यांच्या पुढाकाराने आणि माझे वडील एड. अप्पाराव मैंद यांच्या १२ वर्षांच्या अध्यक्षपदासह माझ्या २३ वर्षांच्या कार्यकाळात, एका शाखेपासून सुरू झालेल्या बँकेचे आज महाराष्ट्रातील ३७ शाखांच्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. नियमित ग्राहकोपयोगी सेवा, पारदर्शक बँकिंग, वेळेवर व्याज देयके आणि सामाजिक उपक्रम या सर्व गोष्टींमुळे पुसद अर्बन बँक ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बँकेचा सीआरएआर २१.५७%, सीआरआर ३.५०%, तर स्वनिधी १२८ कोटी रुपये इतका आहे. बँकेजवळील बुडीत व संशयास्पद कर्ज निधी ३७ कोटी ४१ लाख रुपये आहे. सर्व कर्जांपोटी सुमारे ८०० कोटी रुपयांच्या मालमत्ता गहाण असल्याने ती कर्जे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डीआयसीजीसीच्या नियमानुसार प्रत्येक ठेवीदाराच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी विमा कवचाखाली येतात. त्यामुळे ठेवीदारांच्या पैशाबाबत कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

मागील महिन्यात अफवांमुळे काही ठेवीदारांनी ठेवी काढल्याने बँकेच्या रोख तरलतेवर परिणाम झाला असला तरी परिस्थिती स्थिर करण्यासाठी सर्व उपाय सुरू असल्याचे मैंद यांनी स्पष्ट केले.
“आम्ही सर्व संचालक मंडळ ठेवीदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. कोणत्याही ठेवीदाराच्या एक रुपयालाही धक्का लागणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत ज्येष्ठ संचालक के. आय. मिर्झा, ललित सेता, निळकंठ पाटील, विनायक डुबेवार, प्रवीर व्यवहारे, सुनील चव्हाण, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर उपस्थित होते.

शरद मैंद यांनी यावेळी सर्व प्रसारमाध्यमांचे सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments