पुसद दिनांक २२ ऑक्टो. २०२५ –
तालुक्यातील बँकिंग क्षेत्रात गेल्या चार दशकांपासून आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि मागील २३ वर्षांपासून ठामपणे कार्यरत असलेल्या भारती मैंद पतसंस्था या दोन्ही संस्थांनी आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या संस्थांनी जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरात विश्वासाचे बळकटीकरण केले असून ठेवीदार व कर्जदारांना तत्पर सेवा पुरवून सर्वसामान्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंतचा विश्वास जिंकला आहे.
दोन्ही संस्थांमार्फत छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी यांना व्यवसाय कर्ज, गृहकर्ज, शिक्षण कर्ज अशा विविध योजनांतून आर्थिक बळ देण्यात येत आहे. या कर्ज सुविधांमुळे अनेक उद्योजकांना नवे उद्योग उभारण्याची व वाढविण्याची संधी मिळाली आहे.
मात्र, काही दिवसांपासून ठेवीदारांमध्ये निर्माण झालेल्या गैरसमजुतीमुळे काही ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढण्यास सुरुवात केली आहे. या चुकीच्या निर्णयामुळे दोन्ही संस्थांच्या दैनंदिन व्यवहारावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ही प्रवृत्ती कायम राहिल्यास स्थिर व प्रामाणिकपणे चालणाऱ्या संस्थांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पुसद शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांनी शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठक व पत्रकार परिषद घेतली.
बैठकीत नागरिकांना आवाहन करण्यात आले की, आपल्या हक्काच्या बँकिंग संस्थांवर विश्वास ठेवा, ठेवी सुरक्षित आहेत. चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता या संस्थांना पुन्हा उभारी देण्यासाठी सहकार्य करा.
नागरिकांनी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. बैठकीत उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये नितीन भुतडा, नारायण क्षीरसागर, अॅड. उमाकांत पापीनवार, डॉ. मोहम्मद नदीम, राजन मुखरे, पंजाबराव देशमुख खेडकेकर, राजेश साळुंखे, निशांत बयास, बाळासाहेब पाटील कामारकर, भगवानराव शामराव आसोले, मोहम्मद इरफान मोहम्मद फयाज, निखिल चिद्दरवार, अनिरुद्ध पाटील, नाना बेले, निलेश पेन्शनवार, सुरज डुबेवार, संजय बजाज, अनुकूल चव्हाण, ओमप्रकाश शिंदे, ऋषिकेश पंडितकर, निखिल ठाकरे, गणेश पवार, निखिल गादेवार, अभिषेक पवार, जिया शेख, करण ढेकळे, विनोद जिल्हेवार, डॉ. अकिल मेमन, अभिजीत पानपट्टे, वैभव देशमुख, संग्राम देशमुख, अभिलाष तगलपल्लेवार आदी मान्यवर उपस्थित होते.



