पुसद – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या राज्यव्यापी चळवळीअंतर्गत ग्रामपातळीवर लोकसहभाग आणि लोकवर्गणीचा नवा आदर्श चोंढी ग्रामपंचायतीने निर्माण केला आहे. पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चोंढी गावात आदिवासी समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन विकासासाठी हाती घेतलेल्या निर्णयांचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.
गावातील आंध आदिवासी समाजाच्या २२ व २३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून, ग्रामविकासात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठराव एकमुखी मंजूर करण्यात आले.
पहिल्याच बैठकीत गावकऱ्यांनी महात्मा मुंगसाजी माऊली मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी प्रत्येक घराकडून ₹११०० इतकी लोकवर्गणी गोळा केली जाणार आहे. या उपक्रमातून धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक एकतेचा संदेश दिला गेला आहे.
तसेच समाजातील पारंपरिक अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
गावात होणाऱ्या लग्नसमारंभात कपड्यांच्या आहेरपद्धतीला पूर्णविराम देत, केवळ रोख स्वरूपात आहेर देण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. यामुळे समाजात आर्थिक शिस्त व पारदर्शकता वाढेल, असा विश्वास बैठकीतून व्यक्त करण्यात आला.
याशिवाय, गावात होणाऱ्या विवाह, उत्सव व इतर कार्यक्रमात डी.जे. संगीतावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. तसेच, समाजातील कोणत्याही कार्यक्रमाला गावातील प्रत्येक घरातून किमान एक सदस्य उपस्थित राहून प्रत्यक्ष सहभाग नोंदवेल, असा निर्णयही घेतला गेला आहे — ज्यातून एकोप्याची आणि सामूहिक जबाबदारीची भावना प्रकट झाली आहे.
१५ नोव्हेंबर २०२५ रोजी बिरसा मुंडा जयंती समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरविण्यात आले असून, त्या दिवशी सर्व समाजबांधवांनी पिवळे वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीत गावातील सर्व ज्येष्ठ, तरुण, महिला व कर्मचारी वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या प्रसंगी मुख्याधिकारी श्री. अमोल सुखदेव माळकर (न.प. तिरोडा), शाखा व्यवस्थापक श्री. प्रवीण सुखदेव माळकर (इंडियन ओव्हरसीज बँक पुसद), पोलीस उपनिरीक्षक श्री. देविदास नामदेव पत्रे (वाशिम), श्री. गुलाब प्रभाकर पत्रे (वरिष्ठ लिपिक, आय.जी. ऑफिस अमरावती), ग्रामसेवक संतोष दशरथ पांडे (परभणी), कृषी सहाय्यक शुभम देवराव माळकर (सांगली), जि.प. शिक्षक शरद पुंडलिकराव आगलावे (पुसद), आरोग्य सेवक राहुल वसंत माळकर (नंदुरबार), शिक्षिका सौ. देवीनंदा गोदमले (सातारा), श्री. राहुल वसंत माळकर (आरोग्य सेवक, जिल्हा नंदुरबार), श्री. शरद पुंडलिकराव आगलावे (जि. प. शिक्षक, पुसद), चि. अक्षय रमेश पांडे (लघुलेखक, मुंबई महानगरपालिका), चि. शुभम देवराव माळकर (कृषी सहाय्यक, सांगली), श्री. लक्ष्मण दिवानजी पांडे (पोलीस पाटील, चोंढी), श्री. प्रदीप गंभीर उघडे (अध्यक्ष, बिरसा ब्रिगेड, चोंढी), तसेच श्री. विशाल शालिक नाटकर यांनी उपस्थिती दर्शवून समाजातील ऐक्य, जबाबदारी आणि प्रगतीचा संदेश दिला.
सर्व वक्त्यांनी समाजातील ऐक्य आणि स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले. बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी प्रस्तावांना एकमुखी मान्यता दिली.



