Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsमाणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनतर्फे पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान

माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनतर्फे पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान

तहसीलदार सौ. रेखाताई वाणी यांच्या हस्ते पत्रकारांचा गुणगौरव

पुसद | दिनांक : ६ जानेवारी

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाला दिशा देणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुसद येथील गाडगेबाबा स्मृतीस्थळ, पार्डी रोड, निंबी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात पुसद शहर व परिसरातील तब्बल ८४ पत्रकारांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. समाजहितासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, ‘दर्पण’ वृत्तपत्राचे संस्थापक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमास पुसद तहसीलच्या नवनियुक्त तहसीलदार सौ. रेखाताई वाणी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच जेष्ठ समाजसेवक दत्तात्रय बापूरावजी जाधव, पंकज पाल महाराज, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जगताप आणि शेख मकसूद यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पुसद तहसीलच्या नवनियुक्त तहसीलदार सौ. रेखाताई वाणी यांनी सांगितले की, पत्रकार हे केवळ बातम्या देणारे नसून समाजाला योग्य दिशा देणारे महत्त्वाचे घटक आहेत. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवादाचा सेतू म्हणून पत्रकार कार्य करतात. सत्य, पारदर्शकता आणि जबाबदारी जपत पत्रकारांनी समाजातील प्रश्न निर्भीडपणे मांडावेत, असे त्यांनी नमूद केले. लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी पत्रकारांची भूमिका अनन्यसाधारण आहे. ग्रामीण व तळागाळातील नागरिकांचे प्रश्न शासनदरबारी पोहोचविण्यात पत्रकार मोठे योगदान देतात. टीकेबरोबरच विधायक भूमिका मांडणारी पत्रकारिता समाजासाठी अधिक उपयुक्त ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रशासन अधिक संवेदनशील व कार्यक्षम होण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जबाबदार व सत्यनिष्ठ पत्रकारितेमुळेच समाजात सकारात्मक बदल घडून येतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर संत गाडगेबाबा, राजमाता जिजाबाई व शिवबा राजे यांना वंदन करून व  नुकतेच कर्करोगाच्या आजाराने निधन पावलेले पत्रकार स्व. दिनेश देविदास खांडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पत्रकारांच्या निःस्वार्थ कार्याचे कौतुक करत, समाजप्रबोधन, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि सामान्य नागरिकांचा आवाज बनण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित पत्रकार बांधव व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या सन्मान सोहळ्यास आपुलकीचे व सौहार्दपूर्ण वातावरण लाभले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत देशमुख यांनी केले, तर गजानन जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. पत्रकार बांधवांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments