पुसद :
मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त येथील विरंगुळा योगकेंद्र, ज्येष्ठ नागरिक भवन, पुसद येथे महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या वतीने सकाळी ६.३० वाजता सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा. गोविंद फुके होते. प्रमुख अतिथी म्हणून संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, अँड. बाबुराव मस्के, विलास पलिकोंडावार तसेच उपाध्यक्ष पंडित गादेवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात योगऋषी महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रारंभी योगशिक्षक डॉ. अविनाश जाधव व रंजिता कन्नावार यांनी नियमित योगवर्गाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी योग विद्या धाम, नाशिक येथील योगगुरुजी विश्वासराव मंडलिक यांना राष्ट्रपती कार्यालयातून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी दिल्ली येथे निमंत्रण मिळाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनपर गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात मंदा अघम यांनी स्वरचित स्वागतगीत सादर करून उपस्थित योगसाधकांची मने जिंकली. सूर्यनमस्काराचे मानवी जीवनातील महत्त्व या विषयावर डॉ. मनोज निलपवार व मनोज नाईकसर यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर संघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मानचिन्ह व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे सूर्यनमस्कार तज्ज्ञ प्रविण मस्के यांनी उपस्थित योगसाधकांकडून मंत्रोच्चारासह शास्त्रशुद्ध पद्धतीने १०८ सूर्यनमस्कार करवून घेत सूर्योपासना केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज नाईकसर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. गोविंद फुके यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने योगशिक्षक, पदाधिकारी व योगसाधक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता चहापान व तिळगुळ लाडू वाटपाने करण्यात आली.



